लोकसत्ता संपादकीय अग्रलेख...
नाटो.. नाटो!
युरोपातल्या टुमटार-साजिऱ्या बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्समधील ‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’च्या (नाटो) मुख्यालयात आज आणखी एक झेंडा रोवला गेला.
कज्जेदलालीत बरेच काही गमावलेल्या भांडकुदळ जमीनदारास वर्तमानात मानमरातब मिळवून देण्यास इतिहासातील ताकद पुरेशी ठरत नाही, तसे आजच्या रशियाचे झाले आहे..
युरोपातल्या टुमटार-साजिऱ्या बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्समधील ‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’च्या (नाटो) मुख्यालयात आज आणखी एक झेंडा रोवला गेला. या मुख्यालयाच्या दर्शनी भागात या संघटनेच्या सदस्य देशांचे झेंडे एकसारख्या उंचीवर फडकत असतात.
आजवर तेथे ३० ध्वजस्तंभ होते. आज त्यात ३१ ध्वजस्तंभांची भर पडली. उत्तर गोलार्धास जवळ असलेल्या आणि सहा महिने रात्र-सहा महिने दिवस अनुभवणाऱ्या फिनलंड या देशास आज अधिकृतपणे ‘नाटो’ या अमेरिकाकेंद्री संघटनेत सहभागी करून घेतले गेले.
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोविएत रशिया यांच्यातील शीतयुद्धाच्या तप्त ज्वाळांची झळ सर्व जगास लागण्याआधी जगाची विभागणी झाली. साम्यवाद्यांस विरोध करणारे बरेच देश अमेरिकाकेंद्रित ‘नाटो’ संघटनेचे सदस्य बनले.
साम्यवादी रशियाच्या अरेरावीस विरोध करणे, साम्यवादाचा प्रसार रोखणे इत्यादी अलिखित उद्दिष्टे असलेली ‘नाटो’ ही सदस्य देशांची सामाईक सुरक्षा यंत्रणा बनली. यात आवर्जून लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे ही संघटना अमेरिकाकेंद्रित असली तरी तीत २९ सदस्य हे युरोपीय देश आहेत. म्हणजे अमेरिकेच्या सान्निध्यातील फक्त दोन देश या संघटनेचे सदस्य आहेत. एक म्हणजे खुद्द अमेरिका. आणि दुसरा कॅनडा. याचाच दुसरा अर्थ म्हणजे प्रत्यक्षात ही संघटना अमेरिकेची एक प्रकारे युरोपातील ‘शाखा’च.
आज यात आणखी एका देशाची भर पडली. फिनलंडचे या गटात सहभागी होणे केवळ युरोपच नव्हे तर जागतिक राजकारणासाठीही महत्त्वाचे आहे.
किती ते लक्षात घ्यावयाचे असेल तर फिनलंडच्या ‘नाटो’ प्रवेशाच्या मुद्दय़ावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची आदळआपट सूचक ठरेल. या पुतिन महाशयांनी फिनलंडच्या या निर्णयावर थेट युद्धाचा इशाराच दिला. तो हास्यास्पद ठरतो.
आधीच पुतिन यांनी युक्रेनविरोधात छेडलेले युद्ध त्यांना झेपेनासे झालेले आहे. त्यात ते आणखी एका आघाडीवर संघर्ष सुरू करण्याचा वेडेपणा करण्याची शक्यता कमी. अर्थात पुतिन यांच्याबाबत अशी काही हमी देणे अशक्यच. पुतिन यांना फिनलंडचा राग येण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे रशिया हजारभर किमीची सीमा या आपल्या उत्तरदेशी शेजाऱ्याशी सांभाळून आहे. खरे तर फिनलंडही रशियाची एका अर्थी डोकेदुखी.
दुसरे महायुद्ध होण्याआधी स्टालिनने या देशाचा घास घेऊन आपल्या सीमा विस्तारण्याचा प्रयत्न केला. पण तो चांगलाच अंगाशी आला. मूठभर फिनलंडने पसाभर सोविएत रशियास त्या वेळी चांगलेच झुंजवले. युक्रेन युद्धाच्या निमित्ताने रशियाच्या त्या वेडय़ा साहसाच्या आठवणी अलीकडे जागवल्या गेल्या. म्हणजे ज्या देशाने बलाढय़ सोविएत रशियास त्या वेळी नाचवले तो देश सोविएत नसलेल्या रशियाच्या नाकावर टिच्चून आता उघडपणे शत्रुवत अमेरिकेची तळी उचलून त्यांच्या गटात सामील होतो, हे पुतिन यांच्या रागाचे कारण. ते चुकीचे नाही.
पण पुतिन यांचा स्वत:विषयीचा आणि स्वत:च्या रशिया या देशाविषयीचा समज अत्यंत चुकीचा आहे. माणसे असो वा देश, केवळ संरक्षण इतकेच उद्दिष्ट ठेवून ते एकत्र येतात असे नाही. त्यांच्या एकत्र येण्यामागे विकासाची, परस्परांच्या सहकार्याने परस्परांच्या वाढीची संधी हेदेखील कारण असते आणि ते केवळ संरक्षण या उद्दिष्टापेक्षा महत्त्वाचे असते.
फिनलंड काय वा स्वीडन काय वा लक्झेंबर्ग वा जपान वा जर्मनी वा अन्य. हे सर्व देश प्रामाणिक लोकशाहीवादी आहेत आणि त्यांच्या व्यवहारांत पारदर्शकता आहे. आर्थिक विकासासाठी ही पारदर्शकता अधिक महत्त्वाची. याउलट रशिया एकत्र महासत्ता नाही आणि स्वत:स महासत्तापदी बसवण्याची क्षमता नसताना इतरांच्या बाजारपेठीय विस्तारासाठी तो उपयुक्त ठरण्याची शक्यताही नाही.
रशियाची बाजारपेठ ही बऱ्याच अंशी नियंत्रित आहे आणि देशाची आर्थिक सत्ता ही पुतिन यांच्या मर्जीतील काही धनदांडग्यांहाती आहे. देश म्हणून पाहू गेल्यास रशिया हा अल्पसत्ताकवादी (ओलिगार्की) म्हणायचा. याउलट फिनलंड, स्वीडन आदी उत्तर गोलार्धी देश लोकशाहीवादी आहेत आणि तरीही उत्तम आर्थिक प्रगती राखून आहेत. हा एकेक देश एकेका ब्रॅण्डसाठी ओळखला जातो. फिनलंडने नोकिया दिला, वोल्वो, बोफोर्स इत्यादी ब्रॅण्ड ही स्वीडनची देणगी. या पाश्र्वभूमीवर आजचा रशिया हा कज्जेदलालीत बरेच काही गमावलेल्या भांडकुदळ जमीनदारासारखा आहे.
इतिहासातील ताकद या अशा जमीनदारास वर्तमानात मानमरातब मिळवून देण्यास ज्याप्रमाणे पुरेशी ठरत नाही त्याचप्रमाणे आजचा रशिया हा आदरांस पात्र ठरत नाही. त्यामुळे या देशास अगदी खेटून असलेल्या फिनलंडसारख्या निरुपद्रवी देशास बलाढय़तेचा आव आणणाऱ्या रशियापेक्षा अटलांटिकपलीकडची अमेरिका अधिक विश्वसनीय वाटते. पण त्यासाठी पुतिन अन्य कोणास दोष देऊ शकत नाहीत. त्यांच्या सर्व अडचणी या स्वनिर्मित आहेत.
गेली दोन डझन वर्षे हा गृहस्थ सत्तेवर आहे आणि प्रकृतीने तसेच विरोधकांनी साथ दिल्यास आणखी डझनभर वर्षे तरी ते सत्तेवर राहतील. या आपल्या प्रदीर्घ सत्ताकाळात पुतिन यांनी जगास मतपेटीद्वारे हुकूमशाही आणण्याचा मार्ग दाखवला आणि स्वदेशीयांची बोळवण ते राष्ट्रवादी भावनेवर करत राहिले.
‘राष्ट्रप्रेम, राष्ट्रवादी वा राष्ट्रवाद हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असतो’ या सॅम्युअल जॉन्सन यांच्या विधानाचे प्रत्यक्ष स्वरूप म्हणजे पुतिन. या गृहस्थाने किती जणांचे प्राण घेतले असतील आणि किती जणांस देशोधडीस लावले असेल याची गणती करणे अवघड. आपणास विरोध म्हणजे रशियास विरोध असा समज पुतिन यांनी रशियनांचा करून दिला असून आता तो दूर होत असला तरी सुरुवातीस सर्व हुकूमशहांप्रमाणे त्यांच्याही प्रेमात स्थानिक होते. पण या प्रेमाची परतफेड पुतिन यांनी कशाने केली हा प्रश्न.
युद्धपिपासूपणामुळे जगापासून एकटा पडलेला, युद्धसामग्रीसाठी चीनसारख्या एकेकाळच्या आश्रितसदृश देशाची मदत घ्यावी लागलेला रशिया हा जगातील काही मोजक्याच देशांस अजूनही मित्र वाटतो. त्यातील काही देशांच्या नेत्यांस पुतिन यांच्या राजकीय कौशल्याचे अप्रूप वाटत नसेलच असे नाही आणि त्यांचे अनुकरण करावे असेही वाटत नसेलच असे नाही. पण कोणत्याही खऱ्या लोकशाहीवाद्यांस पुतिन यांच्यासारख्यांची घृणाच येईल.
फिनलंडसारख्या देशांत आज तीच भावना आहे. त्यामुळे उगाच दंडातील बेटकुळय़ा काढून दाखवणाऱ्या आपल्या शेजाऱ्याच्या धमक्यांस कसलीही भीक न घालता हे देश ‘नाटो’चे सदस्यत्व स्वीकारीत आहेत. त्यातही पुढे जाऊन स्वीडन, फिनलंड आदी देशांनी एकमेकांशी हवाई संरक्षणाच्या आणाभाका घेऊन रशियाच्या संभाव्य आक्रमक वृत्तीस रोखण्याची तजवीज केली आहे.
आधीच मुळात ‘नाटो’च्या तत्त्वानुसार एका ‘नाटो’ सदस्य देशावर हल्ला म्हणजे समस्त संघटनेवर हल्ला असे मानून प्रतिकार केला जातो. याचमुळे पुतिन यांना युक्रेनचा राग. कारण फिनलंडप्रमाणे युक्रेनही ‘नाटो’ सदस्यत्वासाठी आतुर होता आणि ते पुतिन यांस सहन होत नव्हते. पण पुतिन जे युक्रेनबाबत करू शकले ते इतरांबाबत होण्याआधीच फिनलंड आदी देश ‘नाटो’त दाखल झाले. आणखीही काही होतील. तेव्हा पुतिन आणि रशियास ‘नाटो.. नाटो’ असे म्हणत हात चोळण्यापलीकडे अन्य काही राहणार नाही.
hi...
ReplyDelete